माझ्याबद्द्ल थोडंसं...

Wednesday, April 21, 2010

"चंद्रभयाची गाणी"





चांदण्यानं न्हाऊन गेली चंद्रभयाची गाणी
सळसळणाऱ्या रात्रीची कहाणी

वाटले ते तसेच होते
भय हवे ते मिळण्याचे
समजा मिळतच गेले
जे जे हवे ते ते
सोसवेल कसे ते
नाजूक या जिवाला
कवळेल कसे मन केंव्हा
बेभान साजणाला

पण नाही झाले तसे
सतत हवे तसे
त्याची सुद्धा होते सवय
त्याची सुद्धा बनते रूढी
म्हणूनच मन कचरत असते
आणि म्हणूनच कदाचित
"चंद्रभयाची" गाणी सुचतात...

चंद्र;
आमावस्या ते पौर्णिमा
मोठा होतो
आणि
पूनवेसून अवसेला खंगत जातो
पण
तो खरंतर
आम्हालाच फसवत जातो
आपण उगा़च
आनंद - दु:ख,
अभय उद् गम आणि विलीन लय
यांची सांगड घालत बसतो...
हे तर सारं सनातन आहे...
पण म्हणून 
"चंद्रभयाची गाणी"
आठवू नयेत असं नाही !!!
नाहीच सुचली गाणीच समजा
नाहीच उरले चंद्रभय
आणि अचानक मेलीच समजा उत्कंठा !?!
नको,
तसं झालंच तर सारं तारांगणच खचून जाईल...
न उतरतील चांदण्या,
न उगवेल कोर ती चांदीची,
न घमघमेल रातराणी,
न उमलेल प्रजक्ताची कळी
नको हे सारं....
त्या पेक्षा मी सुद्धा गात बसेन
तुझी 
"चंद्रभयाची गाणी"

कारण;

तो मिळण्याचं भय असताना
तो आला
तर ???
काय करावं कळणार नाही...

दिपून जाईल सारे अंतर
मिळून जाईल चांदणे चांदण्यात
मनी उन्माद उसळेल
आणि आसावेल काया

उठेल अंगावरती काटा
थंडी चाळवेल वारा
सळसळेल पाचोळा
गंधाळेल मोगरा

काय करू, काय नको असं होईल !!!
हसू का रडू कळणार नाही
आणि कदाचित,
इतक्या उत्कट क्षणानं
त्या चंद्रसाजणानं
लागेल वेड मनाला
हरपेल भान
मिठीत त्याच्या

म्हणून,
म्हणूनच कदाचित,
कवडशात दिसणाऱ्या धूळीच्या
लुकलुकत्या, सोनेरी कणांइतकेच विचार
मनात येत जातात...
आणि
इतकं सूख सहन होईल कि नाही ?
या भयानं
"चंद्रभयाची गाणी"
सुचतात.....


- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.