माझ्याबद्द्ल थोडंसं...

Monday, August 19, 2013

थकले अंगण

थकल्या अंगणात आता
तुझेच आठव घुमणार
तू येऊन गेल्याचे
जग भासमान होणार

त्या अखंड धारेला
मी ओंज़ळ धरलेली
मी ओठाशी आणताना
केवळ ओली झालेली

ते अतृप्त आज़ ओठ
ते हात मोकळेच
घर बांधायाचे स्वप्न
नुसताच पोरखेळ

ती भातुकली धोक्यात
वाढे अंतर ठोक्यात
मी ज़पून ठेवीन अत्तर
उरलेले खोक्यात

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, December 22, 2011

निघून ज़ाईन मी..

निघून ज़ाईन मी
ओलेत्या वाटांवरून
आलो तसा
तुला शोधत
किती वाट पाहायची
टेकडीच्या माथ्यावर
अज़ून ढगांचा ओला वास तसाच आहे
माझ्यापाशी,
ह्या डोंगर पठारावरल्या
गवत फुलानंही तुझाच घोशा लावलाय
तुला कसं वागावं हे कळत नाही
आणि मला तर नाहीच नाही
मी सुद्ध निघून ज़ायला पहिजे होतं एव्हाना
तू आला नहीस म्हणून
पण का कुणास ठाऊक
पाऊल उचलेच ना
वेडेपणाच सगळा

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Sunday, July 17, 2011

ज़मीन, मी, अळी आणि आभाळ

भ्रम
मी रात्रीचा तसाच,
अंधारातून चालत होतो…
तशी, कोणतीच दिशा
नव्हती मला

तेवढ्यात,
एका वडाखालून जाताना
अचानक
एक अळी आडवी आली !
आधी वाटलं आधांतरी तरंगतीय…
पण नाही,
ती
एका धाग्याला धरून,
सतत चढत किंवा उतरत चालली होती
मी
बघितलं,
अनंत आकाशाकडे
ती
चालली होती
ज़मीनीकडे किंवा अनंत आकाशाकडे
पण
समोरच्या क्षणाला
आम्ही
बरोबरीला होतो
समान पातळीवर !

खाली ज़मीन
वड त्यावर
आणि पुढे अनंत आकाश

नक्की कोण कुठे चाललय
याचा थांगपत्ताच लागेना

अळी खाली
मी वर

किंवा
सुलटही असेल

ज़मीनीचं छत
आणि
आभाळाचं अंगणही…

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Sunday, March 20, 2011

आठवण

काय होते अवस्था
ते आर्त कुठल्या वेदनेचे
कसे सांगणार तुला,
आणि
हे सलणारे मधुकोष
शब्दांचे...
पोचणार कसे तुझ्यापाशी
काय माहीत कुठल्या वाटा
नेतील तुझ्यापर्यंत
आणि
काय माहीत
किती वाटा चुकणार आहेत
भिती याचीच की
आपण टोकं गाठू नयेत !
सुरांचे झोत वाहात बसतो
सतत तुझंच तप
कधीतरी पोचतील गुंजने,
तुझ्यापर्यंत
आणि
आठवण रोज़ काढत बसतो,
कधीतरी
उचकी लागेल तुला

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Friday, November 26, 2010

दंभ

पुसतोस तू कशाला ?
पाने कुणाच्या तोंडाला
दिसतेच ऋतूंची करणी
नाटकी थरकापतोस कशाला ?

ढोंगे केंव्हाची, झालीत कालबाह्य
तू हे वेड पांघरतोस कशाला ?
देखावे मी पाहतोच नेहमी
तू तुझी भर घालतोस कशाला ?

अनेक रामायणे महाभारते
बिघडवली नासवली ढोंग्यांनी,
माझी भरभरून आरती गाऊन
मला विटाळतोस कशाला ?

बेल वाहा, दुर्वांच्या कर ज़ुड्या
दाखव सारं दगडाला
जिवंत माणसा समोर
दिवे नकलांचे नाचवतोस कशाला ?

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Tuesday, October 5, 2010

बुद्धपौर्णिमा

चंद्रकळा पूर्ण पौर्णिमेची होती
अनंत अनंग बुद्धपौर्णिमेची होती
चालले होते ढग आकाशातून
वाळवंटातून घसटत ज़ाणाऱ्या
वाऱ्यानं फडफडत्या काफ़िल्यांसारखे...

त्या गौतमानं आज
नि:श्वास सोडला असता...
इमारतीच्या भकास गच्चीवरून
दिसणाऱ्या भोवताल घेरून पसरलेल्या
घाणीचा पसारा बघून...
झोपडपट्टीचा घंताडा जुडगा बघून...
गरळ ओकणारे नाले,
आणि त्यात न्हाणारी,
अळ्यांसारखी बुज़बुज़लेली माणसं,
हे सारं बघून
त्यानं नक्कीच हाय खाल्ली असती...

नज़र शून्यात गेली
तीथेच काळ लोटला
चेतना साकळल्या
आणि
देहभान सरलं !
मागच्या बाभळींचे बोधिवृक्ष झाले

मी

चेहेरा

अंधारात

लपवून

घेतला

शांतपणे

कोषातून बाहेर आलो तेंव्हा

माझाही बुद्ध झाला होता !

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, August 19, 2010

अनवट वेदना

कधी कधी तुझ्या नसण्याची
जाणीव तीव्र होते
अपरात्रीचीच किंवा
अशाच अवेळी
तुझ्या नसण्याची पोकळी
चहूकडून रुंदावत जाते
चेहेरे अनोळखी होतात,
माणसं गैर !
आणि
कशा कशानं म्हणून,
तू
उभा रहात नाहीस
तो उचंबळ
साऱ्या सीमांना पार करून जातो
तेंव्हा
फ़क्त उरते
एक अनवट वेदना
अनवट अशा आशाकल्पांमधून
आणि
कल्पनेतला तुझा शोध
स्वप्नांमधून झिरपत
ह्या आयुष्यालाच
झोंबत राहातो
खरा होऊन
आणि होत जातो
आणखी गडद
एकटेपणा
आसपासच्या कोलहलात,
माणसांच्या गर्दीत;
जिव्हारात दडपलेलं वादळ पेलणारं
कुणी नाही !
हे कळवळून सांगणारा....
स्वत:शीच अक्रंदण्यानं
छातीतल्या छातीत
किंकाळी रुतवण्यानं
जीव तडफ़डत रहतो....
तळ न सापडणाऱ्या काळ्या
भयाण डोहात ओढल्या जाणाऱ्या
निराधार धाराप्रवाहासारखा....
तरीही
शोध सुरूच आहे....
माझा स्वत:चा;
तुझाही,
आणि
शोध सुरूच आहे
समजून घेतलं जाण्याचा,
सर्वस्वाचा उच्च संवाद साधता येण्याचा
आणि तो तसाच
सुरू राहील...
तुझा शोध लागेपर्यंत,
तुझ्या डोळ्यांचा,
अनिमिष डोळ्यात बघत राहाण्याचा
हक्क मिळवण्याचा,
आणि
कुणाचीही पर्वा न करता
हलकेच गालावरून
हात फिरवता येण्याचा
साधा
शोध...

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :
© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, June 24, 2010

रात्र काळी

रात्र हि काळि ढगांनी कवळिली
भार हा गंधित कसा तिला सोसवेल

रत्न ओळीयांनी गुंफ़ियेली घनमाळ
कसा झाला गं पाऊस इतुका वेल्हाळ

आकाशीचा गं चांदवा झुलतो साजरा
चंद्र की साजण माझा चंदनाचा

ओलीचिंब रानवेल कशी फुलियेली
जणू सखीच साजणी संग बोलियेली

अंगी रात्र काळी ओली अंग-अंगी
साजण मिठीतली साजणी घामेजली

तिच्या नस नसात घुमतो मत्त माज
मुसमुसते साजणी, उराशी साजण हुंकारतो

मावेना प्रीत दोन अंगांच्या मिठीत
होता संग तिचा-त्याचा मन मधाळ मूळीचा

कशी मावळेल रात रुतलेली काळजात
जणू जाईचे काजळ, गोंदलेले की भाळात

मन भोर भोर, डोळे काळे, काजळ नितळ
रात साजणी, चांद साजण;

नाही भान कसलेच
पुसटली काळवेळ

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the melaxmikant.blogspot.com and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Wednesday, April 21, 2010

"चंद्रभयाची गाणी"

चांदण्यानं न्हाऊन गेली चंद्रभयाची गाणी
सळसळणाऱ्या रात्रीची कहाणी

वाटले ते तसेच होते
भय हवे ते मिळण्याचे
समजा मिळतच गेले
जे जे हवे ते ते
सोसवेल कसे ते
नाजूक या जिवाला
कवळेल कसे मन केंव्हा
बेभान साजणाला

पण नाही झाले तसे
सतत हवे तसे
त्याची सुद्धा होते सवय
त्याची सुद्धा बनते रूढी
म्हणूनच मन कचरत असते
आणि म्हणूनच कदाचित
"चंद्रभयाची" गाणी सुचतात...

चंद्र;
आमावस्या ते पौर्णिमा
मोठा होतो
आणि
पूनवेसून अवसेला खंगत जातो
पण
तो खरंतर
आम्हालाच फसवत जातो
आपण उगा़च
आनंद - दु:ख,
अभय उद् गम आणि विलीन लय
यांची सांगड घालत बसतो...
हे तर सारं सनातन आहे...
पण म्हणून 
"चंद्रभयाची गाणी"
आठवू नयेत असं नाही !!!
नाहीच सुचली गाणीच समजा
नाहीच उरले चंद्रभय
आणि अचानक मेलीच समजा उत्कंठा !?!
नको,
तसं झालंच तर सारं तारांगणच खचून जाईल...
न उतरतील चांदण्या,
न उगवेल कोर ती चांदीची,
न घमघमेल रातराणी,
न उमलेल प्रजक्ताची कळी
नको हे सारं....
त्या पेक्षा मी सुद्धा गात बसेन
तुझी 
"चंद्रभयाची गाणी"

कारण;

तो मिळण्याचं भय असताना
तो आला
तर ???
काय करावं कळणार नाही...

दिपून जाईल सारे अंतर
मिळून जाईल चांदणे चांदण्यात
मनी उन्माद उसळेल
आणि आसावेल काया

उठेल अंगावरती काटा
थंडी चाळवेल वारा
सळसळेल पाचोळा
गंधाळेल मोगरा

काय करू, काय नको असं होईल !!!
हसू का रडू कळणार नाही
आणि कदाचित,
इतक्या उत्कट क्षणानं
त्या चंद्रसाजणानं
लागेल वेड मनाला
हरपेल भान
मिठीत त्याच्या

म्हणून,
म्हणूनच कदाचित,
कवडशात दिसणाऱ्या धूळीच्या
लुकलुकत्या, सोनेरी कणांइतकेच विचार
मनात येत जातात...
आणि
इतकं सूख सहन होईल कि नाही ?
या भयानं
"चंद्रभयाची गाणी"
सुचतात.....

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, March 11, 2010

डोळे भिजून गेले,
गालावरती ओघळले थेंब
मारव्याचे सूर ऐकताना

गुंजत राहतो तुझाच श्वास
उठतात कंपने ती
जाणीव तुझ्याच ओठांची

लव तीच थरारते
काटा तसाच उठतो
गोऱ्या अंगावर

बिलगावे कुणाला
ऊब कुणाची कवटाळावी
सोबत कुणीच नसताना

कपाळावरून हात फिरण्याचा भास
स्वत:ला फसवताना
ओरडावसं वाटलं

लयीत का झुलायचं
कशाला नसती
झूल बांधायची मनाला

का उडायचं आकांक्षांची
लेवून खुळी पिसं
खुळ्यासारखं

का हे गुंतून पडायचं
कुणाच्या तरी सुरांत
हरवलेल्याच्या शोधात
कसल्यातरी वेडाच्या भरात

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Monday, February 22, 2010

आलिप्त

रुतले वाळूत पाय त्या बहकल्या लाटांचे
रुतले चांदणे पाण्यात डोलत्या चंद्राचे
लेवून बिलोरी साज़ ढगांचे नांदते आकाश आहे
व्याधाची चांदणी मृगनक्षत्राला वेधते आहे

कुठल्यातरी वेडापाई दूरचा दीपस्तंभ उभाच आहे
हट्टानं कुणाला तरी कसलीतरी वाट दाखवतो आहे

मझ्याशी मात्र सोयरं-सुतक नाही
कारण मी बुडत नाहीय...
बुडणार पण नाही आहे
लाटांनी मला बुडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी...
कारण, कारण....
मी लांब होतो,
अगदी इंचभरच
नेहमी प्रमाणे,
त्यांच्या गाज़ेचा खर्ज मला भिती घालायला अपुरा होता
वेळ ओहोटीची होती, माझ्या पथ्यावर...
आणि संपल होतं त्याचं जग माझ्या नखाच्या टोकावर
नेहमी प्रमाणे,
त्या घोंघावणाऱ्या, अनिर्बंध आणि प्रचंड अशा जलकोषाला वाळूनं कोंडून ठेवलं होतं
मी मात्र उभा होतो
निर्धारानं,
स्वत:वरच्या निष्ठेनं,

वेळ त्याचीही आली होती,
गटांगळ्या मी ही खाल्ल्या होत्या
तो मला आयता गिळू पहात होता,
पण,
मी हातपाय मारले होते
तोंडाशी आयतं आल्यावर गिळून टाकायला
मी त्याच्यासरखा ऐदी नव्हतो,
ती संधी मी त्याला लाभू दिली नव्हती
पुन्हा वेळ येणार नाहीच
आली तरी
मला बुडवण्याची संधी मी त्याला लाभू देणार नाही, हे नक्की !
आता तर मी केली आहे किनाऱ्याशी सलगी
बांधली आहे अभेद्य नौका
अजून ही तसा त्याच्या समोर मी दिसतो दुबळाच
पण आता
हापापल्या, लपलपत्या लाटांच्या जिभांची धास्ती नाही मला...
आलिप्त होतो मी
आणि साग़र होता हतबल
मजेशीरच होतं
मी आणि तो....
समोरासमोर....
किनाऱ्यावर मी होतो उभा
आणि समुद्र होता आडवा....

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Friday, December 18, 2009

होते सांगायचे तुला, इथे पडतो पाऊस ।

तुला नाहीच पटले, माझं ऐकतो पाऊस ॥

नभ दाटून आलेले, मुक्त कोसळे पाऊस

धरणीशी ऊरभेट, मनी हर्षतो पाऊस

तुझ्यासवे बोलताना, उगा यायचा पाऊस ।

मन भिजवून जाताना, उगा हसतो पाऊस ॥

तु आहेस दूर तिथे, तु आहेस इथेही ।

तुझी सततची आठवण, रुजवतो हा पाऊस ॥

होती आसावली पाने, तहानलेली वेल ।

तुला कोणी म्हणे वेडा, कोणी म्हणते पाऊस ॥
.
.
.

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, December 17, 2009

विरह

भर रात्रीचा एकटा, होतो चांदणे पाहत

होती तुझी आठवण, मंद वाऱ्याशी खेळत

पहुडलो छतावर, वर तांरांगण होते सारे

ग्रह गोलांचे-ताऱ्यांचे, अनंत पसारे

चांदण्याचा पडे खच, पाणावल्या नयनात

तुझ्या नसण्याने सारे, रिते झाले आसवात

तू रे नाहीस सोबत, हात नाही हातामधे

नाहीस तू येथे, घ्याया स्वप्नांना कवेत

का रे हा दूरावा, दिसे अपार अथांग

काळ जरा ही हालेना, पळ युगांचा सरेना

काळ क्रूर अंधारात, मला पाडतो एकटा

नको पुन्हा दूर जाऊ, पुन्हा भेटशील जेंव्हा

चूक नव्हे तुझी माझी, ही त्या वेळेचीच चूक

कशी अभद्र अवेळी, आपली झाली चुकामूक

पंख लाऊन वेगाने, तुझ्यापाशी यावे वाटे

करता येत नाही काही, याची खंत मनी दाटे

काळजी तू करु नको, एका रात्रीचा आहे प्रश्न

दूर तसा तू नाहीस, हे ही तुला मला ठावे....

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Friday, August 28, 2009

बदल...

या संभ्रमातुन वेदनेतुन, सुटणार कधी हे जगणे रे...
झाले कसे वेगळेच आता तुझे नेहमीचे वागणे रे...

का ? तू खेळावे भावनेशी माझ्या ?
का ? मी द्यावे हाती तुझ्या,
माझ्या आयुष्याचे खेळणे रे...

काय ते परतून येतिल, गेलेले क्षण प्रेमाचे
कुठे आटले आता तुझे तोंडभरूनचे हासणे रे....

जतोस जवळून आता जसा,
ओळख नवखी माणूस परका...
हे कसले वेड पांघरणे रे...

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
The content posted above is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Monday, August 3, 2009

डागाळलेला चंद्रकांत

चंद्रकांताच्या फुलांनी सजवून पानं,
मी तुझी वाट पाहिली होती
गुलाबाच्या पाकळ्या कुरवाळताना,
मी तुझ्या नाजुक ओठांचा विचार केला होता...
तू आलीच नाहीस...!
आता दु:खालाही जागा उरली नाही
सगळीकडे तूच होतीस,
दु:ख कुठे ठेउ ?
विचार केला होता आपण भेटू मनभर,
एकमेकांसाठी होऊ सैरभैर,
पण,
अंदाज़, विचार, इच्छा, अपेक्षा आणि स्वप्नं;
वास्तवाशी फ़ारकत घेत जातात....
नेहमिप्रमाणे....!
तेंव्हा,
आपल्या हातात काय राहिलं याचा विचार येतो...
मोठंच प्रश्नचिन्ह !
पर्वा नसलेल्या व्यक्तीवर प्रेम केल्याची जाणीव;
तिचा सल खुपत राहातो
ही फ़सवणूक तरी कशी ?
हा स्वत:च स्वत:शी केलेला खोटारडे पणा नाही का ?
सगळं समोर असून जाणून-बुजून केलेलं दुर्लक्ष !
कि हलगर्जीपणा ?
ह्याला काय म्हणायचं ?
ज़ुगार...
आयुष्याचा...!
भावनांचा...!
मनानं मनावर केलेला अन्याय...?
की;
स्वप्नं पाहून ती सत्यात उतरतील,
अशी वेडी आशा ?
माहीत नाही पण तू सोडून ज़ाशील, हे माहीत आसतं तर...?
"मी प्रेम केलं नसतं !"
अशी वल्गना करावीशी वाटते,
पण,
तू ज़ाणार;
हे माहीत असताना,
खडा टाकून बघावा,
असं म्हणता,
त्या बरोबर गडगडत गेलेला मी !
त्या चंद्रकांताच्या फुलांचा,
चुरगळलेला देह बघून,
माझ्या चुकीनं;
त्या दुर्दैवी फुलांना,
दोन शरीरांचा उन्माद तर नाहीच,
पण,
साधी उरभर मिठी पडताना,
चुरगळण्याचं भाग्य न लाभता,
एका,
रित्या आणि हलक्या माणसाच्या एकटेपणाखाली चुरगळावं लगलं...
वाईट वाटतं;
न कळत,
त्याचीही स्वप्नं चुरगाळलीस तू...
मी ही गंधाळलो असतो,
तुलाही मी कमी ज़पलं नसतं !
पण हे मी म्हणून काय उपयोग !?
तुला तेव्हडं कळतं तर अज़ून काय हवं होतं !?
यावर ताण म्हणून;
उपयोग नसताना,
किंवा तेव्हडं बोलून आपण समोरच्याला दुखावतोय ह विचार न करता;
"मला माफ़ कर" म्हणालीस !
का ?
ज़खमेवर मीठ चोळून काय मिळालं तुला ?
मला माफ़ कर म्हटल्यानं माझं प्रेम मला मिळणार नव्हतं !
मला सोडून ज़ाणाऱ्या;
तुला;
अडवण्याचं बळ माझ्यात येणार नव्हतं !
कांही गोष्टी करण्याआधीच विचार करावा लागतो...
मान कापून बळी दिल्यावर
मग गुलाल फासून काय उपयोग ?
हे म्हणजे,
तोडून चिकट्वल्यासारखं झालं !
ते पुन्हा कसं जुळेल ?
प्रेम अज़ोड आहे... म्हणतात !
विरह सुद्ध तेव्हडाच अज़ोड आहे,
एकटेपणा त्याहून
आणि सहवासानंतर आलेला एकटेपणा त्यहून अज़ोड !
माझ्यात काय कमी होतं ?
खूप कांही कमी असेल !!!
तसं नसतं तर,
सोडून कशाला गेली असतीस ?
असं स्वत:शी म्हणून;
एक क्षण
स्वत:चं समाधान करून घेतलं !
पण ते क्षणभरच !
पुढच्या क्षणाचं काय ?
मला सोडून जाताना,
हे विचारही सोडवून गेली असतीस तर फार बरं झालं असतं !

फुका मृगजळाच्या मागे धावणं । फुका चंद्रकांताला कुरवाळणं ॥
माझ्या आयुष्याला नसता फुकाचा । असला डाग देवून डागाळणं ॥

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
The content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.