माझ्याबद्द्ल थोडंसं...

Friday, November 26, 2010

दंभ

पुसतोस तू कशाला ?
पाने कुणाच्या तोंडाला
दिसतेच ऋतूंची करणी
नाटकी थरकापतोस कशाला ?

ढोंगे केंव्हाची, झालीत कालबाह्य
तू हे वेड पांघरतोस कशाला ?
देखावे मी पाहतोच नेहमी
तू तुझी भर घालतोस कशाला ?

अनेक रामायणे महाभारते
बिघडवली नासवली ढोंग्यांनी,
माझी भरभरून आरती गाऊन
मला विटाळतोस कशाला ?

बेल वाहा, दुर्वांच्या कर ज़ुड्या
दाखव सारं दगडाला
जिवंत माणसा समोर
दिवे नकलांचे नाचवतोस कशाला ?

- लक्ष्मीकांत

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Tuesday, October 5, 2010

बुद्धपौर्णिमा

चंद्रकळा पूर्ण पौर्णिमेची होती
अनंत अनंग बुद्धपौर्णिमेची होती
चालले होते ढग आकाशातून
वाळवंटातून घसटत ज़ाणाऱ्या
वाऱ्यानं फडफडत्या काफ़िल्यांसारखे...

त्या गौतमानं आज
नि:श्वास सोडला असता...
इमारतीच्या भकास गच्चीवरून
दिसणाऱ्या भोवताल घेरून पसरलेल्या
घाणीचा पसारा बघून...
झोपडपट्टीचा घंताडा जुडगा बघून...
गरळ ओकणारे नाले,
आणि त्यात न्हाणारी,
अळ्यांसारखी बुज़बुज़लेली माणसं,
हे सारं बघून
त्यानं नक्कीच हाय खाल्ली असती...

नज़र शून्यात गेली
तीथेच काळ लोटला
चेतना साकळल्या
आणि
देहभान सरलं !
मागच्या बाभळींचे बोधिवृक्ष झाले

मी

चेहेरा

अंधारात

लपवून

घेतला

शांतपणे

कोषातून बाहेर आलो तेंव्हा

माझाही बुद्ध झाला होता !

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, August 19, 2010

अनवट वेदना

कधी कधी तुझ्या नसण्याची
जाणीव तीव्र होते
अपरात्रीचीच किंवा
अशाच अवेळी
तुझ्या नसण्याची पोकळी
चहूकडून रुंदावत जाते
चेहेरे अनोळखी होतात,
माणसं गैर !
आणि
कशा कशानं म्हणून,
तू
उभा रहात नाहीस
तो उचंबळ
साऱ्या सीमांना पार करून जातो
तेंव्हा
फ़क्त उरते
एक अनवट वेदना
अनवट अशा आशाकल्पांमधून
आणि
कल्पनेतला तुझा शोध
स्वप्नांमधून झिरपत
ह्या आयुष्यालाच
झोंबत राहातो
खरा होऊन
आणि होत जातो
आणखी गडद
एकटेपणा
आसपासच्या कोलहलात,
माणसांच्या गर्दीत;
जिव्हारात दडपलेलं वादळ पेलणारं
कुणी नाही !
हे कळवळून सांगणारा....
स्वत:शीच अक्रंदण्यानं
छातीतल्या छातीत
किंकाळी रुतवण्यानं
जीव तडफ़डत रहतो....
तळ न सापडणाऱ्या काळ्या
भयाण डोहात ओढल्या जाणाऱ्या
निराधार धाराप्रवाहासारखा....
तरीही
शोध सुरूच आहे....
माझा स्वत:चा;
तुझाही,
आणि
शोध सुरूच आहे
समजून घेतलं जाण्याचा,
सर्वस्वाचा उच्च संवाद साधता येण्याचा
आणि तो तसाच
सुरू राहील...
तुझा शोध लागेपर्यंत,
तुझ्या डोळ्यांचा,
अनिमिष डोळ्यात बघत राहाण्याचा
हक्क मिळवण्याचा,
आणि
कुणाचीही पर्वा न करता
हलकेच गालावरून
हात फिरवता येण्याचा
साधा
शोध...

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :
© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, June 24, 2010

रात्र काळी

रात्र हि काळि ढगांनी कवळिली
भार हा गंधित कसा तिला सोसवेल

रत्न ओळीयांनी गुंफ़ियेली घनमाळ
कसा झाला गं पाऊस इतुका वेल्हाळ

आकाशीचा गं चांदवा झुलतो साजरा
चंद्र की साजण माझा चंदनाचा

ओलीचिंब रानवेल कशी फुलियेली
जणू सखीच साजणी संग बोलियेली

अंगी रात्र काळी ओली अंग-अंगी
साजण मिठीतली साजणी घामेजली

तिच्या नस नसात घुमतो मत्त माज
मुसमुसते साजणी, उराशी साजण हुंकारतो

मावेना प्रीत दोन अंगांच्या मिठीत
होता संग तिचा-त्याचा मन मधाळ मूळीचा

कशी मावळेल रात रुतलेली काळजात
जणू जाईचे काजळ, गोंदलेले की भाळात

मन भोर भोर, डोळे काळे, काजळ नितळ
रात साजणी, चांद साजण;

नाही भान कसलेच
पुसटली काळवेळ

- लक्ष्मीकांत

Please Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the melaxmikant.blogspot.com and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Wednesday, April 21, 2010

"चंद्रभयाची गाणी"

चांदण्यानं न्हाऊन गेली चंद्रभयाची गाणी
सळसळणाऱ्या रात्रीची कहाणी

वाटले ते तसेच होते
भय हवे ते मिळण्याचे
समजा मिळतच गेले
जे जे हवे ते ते
सोसवेल कसे ते
नाजूक या जिवाला
कवळेल कसे मन केंव्हा
बेभान साजणाला

पण नाही झाले तसे
सतत हवे तसे
त्याची सुद्धा होते सवय
त्याची सुद्धा बनते रूढी
म्हणूनच मन कचरत असते
आणि म्हणूनच कदाचित
"चंद्रभयाची" गाणी सुचतात...

चंद्र;
आमावस्या ते पौर्णिमा
मोठा होतो
आणि
पूनवेसून अवसेला खंगत जातो
पण
तो खरंतर
आम्हालाच फसवत जातो
आपण उगा़च
आनंद - दु:ख,
अभय उद् गम आणि विलीन लय
यांची सांगड घालत बसतो...
हे तर सारं सनातन आहे...
पण म्हणून 
"चंद्रभयाची गाणी"
आठवू नयेत असं नाही !!!
नाहीच सुचली गाणीच समजा
नाहीच उरले चंद्रभय
आणि अचानक मेलीच समजा उत्कंठा !?!
नको,
तसं झालंच तर सारं तारांगणच खचून जाईल...
न उतरतील चांदण्या,
न उगवेल कोर ती चांदीची,
न घमघमेल रातराणी,
न उमलेल प्रजक्ताची कळी
नको हे सारं....
त्या पेक्षा मी सुद्धा गात बसेन
तुझी 
"चंद्रभयाची गाणी"

कारण;

तो मिळण्याचं भय असताना
तो आला
तर ???
काय करावं कळणार नाही...

दिपून जाईल सारे अंतर
मिळून जाईल चांदणे चांदण्यात
मनी उन्माद उसळेल
आणि आसावेल काया

उठेल अंगावरती काटा
थंडी चाळवेल वारा
सळसळेल पाचोळा
गंधाळेल मोगरा

काय करू, काय नको असं होईल !!!
हसू का रडू कळणार नाही
आणि कदाचित,
इतक्या उत्कट क्षणानं
त्या चंद्रसाजणानं
लागेल वेड मनाला
हरपेल भान
मिठीत त्याच्या

म्हणून,
म्हणूनच कदाचित,
कवडशात दिसणाऱ्या धूळीच्या
लुकलुकत्या, सोनेरी कणांइतकेच विचार
मनात येत जातात...
आणि
इतकं सूख सहन होईल कि नाही ?
या भयानं
"चंद्रभयाची गाणी"
सुचतात.....

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Thursday, March 11, 2010

डोळे भिजून गेले,
गालावरती ओघळले थेंब
मारव्याचे सूर ऐकताना

गुंजत राहतो तुझाच श्वास
उठतात कंपने ती
जाणीव तुझ्याच ओठांची

लव तीच थरारते
काटा तसाच उठतो
गोऱ्या अंगावर

बिलगावे कुणाला
ऊब कुणाची कवटाळावी
सोबत कुणीच नसताना

कपाळावरून हात फिरण्याचा भास
स्वत:ला फसवताना
ओरडावसं वाटलं

लयीत का झुलायचं
कशाला नसती
झूल बांधायची मनाला

का उडायचं आकांक्षांची
लेवून खुळी पिसं
खुळ्यासारखं

का हे गुंतून पडायचं
कुणाच्या तरी सुरांत
हरवलेल्याच्या शोधात
कसल्यातरी वेडाच्या भरात

- लक्ष्मीकांत बोंगाळे

Plese Note The Following Disclaimer :

© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.

Monday, February 22, 2010

आलिप्त

रुतले वाळूत पाय त्या बहकल्या लाटांचे
रुतले चांदणे पाण्यात डोलत्या चंद्राचे
लेवून बिलोरी साज़ ढगांचे नांदते आकाश आहे
व्याधाची चांदणी मृगनक्षत्राला वेधते आहे

कुठल्यातरी वेडापाई दूरचा दीपस्तंभ उभाच आहे
हट्टानं कुणाला तरी कसलीतरी वाट दाखवतो आहे

मझ्याशी मात्र सोयरं-सुतक नाही
कारण मी बुडत नाहीय...
बुडणार पण नाही आहे
लाटांनी मला बुडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी...
कारण, कारण....
मी लांब होतो,
अगदी इंचभरच
नेहमी प्रमाणे,
त्यांच्या गाज़ेचा खर्ज मला भिती घालायला अपुरा होता
वेळ ओहोटीची होती, माझ्या पथ्यावर...
आणि संपल होतं त्याचं जग माझ्या नखाच्या टोकावर
नेहमी प्रमाणे,
त्या घोंघावणाऱ्या, अनिर्बंध आणि प्रचंड अशा जलकोषाला वाळूनं कोंडून ठेवलं होतं
मी मात्र उभा होतो
निर्धारानं,
स्वत:वरच्या निष्ठेनं,

वेळ त्याचीही आली होती,
गटांगळ्या मी ही खाल्ल्या होत्या
तो मला आयता गिळू पहात होता,
पण,
मी हातपाय मारले होते
तोंडाशी आयतं आल्यावर गिळून टाकायला
मी त्याच्यासरखा ऐदी नव्हतो,
ती संधी मी त्याला लाभू दिली नव्हती
पुन्हा वेळ येणार नाहीच
आली तरी
मला बुडवण्याची संधी मी त्याला लाभू देणार नाही, हे नक्की !
आता तर मी केली आहे किनाऱ्याशी सलगी
बांधली आहे अभेद्य नौका
अजून ही तसा त्याच्या समोर मी दिसतो दुबळाच
पण आता
हापापल्या, लपलपत्या लाटांच्या जिभांची धास्ती नाही मला...
आलिप्त होतो मी
आणि साग़र होता हतबल
मजेशीरच होतं
मी आणि तो....
समोरासमोर....
किनाऱ्यावर मी होतो उभा
आणि समुद्र होता आडवा....